नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर (NRC), आणि एनपीआर (NPR) आणण्याचं जे काम सरकारने केलेलं आहे त्याच्या मागे त्यांचा एक लपलेला अजेन्डा आहे. हा अजेंडा आता उघडकीस येतो आहे. त्यांचा मुख्य हेतू असा आहे की त्यांना काही समाजांना मुख्य धारेपासून दूर करायचं आहे. ते हळूहळू त्यांनी केलंच होतं पण आता शेवटचा घाव घालून या समाजांना तोडण्याचा हा प्रयत्न आहे.
यामुळे आपल्या देशाची जी पारंपरिक वीण आहे, ती विस्कटली जाणार आहे. ही पारंपरिक वीण उस्कटवून सरकारला या देशाला फाळणीकडे घेऊन जायचं आहे. हिंदू राष्ट्र घडवण्याच्या दिशेमध्ये हे एक पाऊल आहे असं दिसून येत आहे. फाळणी कशी होईल मला माहित नाही पण परिस्थिती एवढी बेकार आहे की आतल्या आतच दंगली आणि मुडदे पाडण्याचं हे कारस्थान आहे असंच वाटत आहे. हे प्रकरण आपल्या देशाला एका मोठ्या रक्तपाताकडे घेऊन जाऊ शकतं.
दुसरी गोष्ट जी त्यांना नको होती ती म्हणजे संविधान. त्या संविधानाच्या गाभ्यावर हा एक हल्ला आहे. अश्या प्रकारे भारताचे संविधान आणि पारंपरिक वीण ह्या दोन्ही गोष्टीना टार्गेट करण्याचं हे षडयंत्र आहे. ह्या देशावर ब्राह्मणी संकृतीचं वर्चस्व पुनःश्च लादण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे.