गौरी

(गौरी लंकेश यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त)

तू,
तुझ्या प्रचंड दिव्यांचा झोत
टाकत राहिलीस
शांतपणे…

शांतीसाठी,
तुझ्या माझ्या नि इतरांच्या.

मी माझी मूठ आवळतो
तुझ्या दिव्यापाठीमागे.

माहीत आहे…
हिंसेचा पूर व्यवस्थित निर्माण केला जातोय.

तुझी आर्तता,
मृदुता,
सहनशिलता,
संयम होता
भविष्यात येणाऱ्या अंधूक शक्यतांसाठी ;
प्रकाशात परावर्तीत होण्याच्या झोक्यांचा
तुला अदमास होता.

तू,
त्या स्वप्नांसाठी
झटत राहलीस
कायम…

या स्वप्नांना
आकार देतानाच
तुझ्यावर आभाळ कोसळवले
रक्ताचे.

आमच्या मुठी आहेत
गौरी,
तुझ्या दिव्यात जळत.

तो तेवत आहे;
राहील;
राहणार.

मुठींच्या आंत आहेत
तुझीच आर्तता,
मृदुता
आणि सहनशिलता ;

भविष्यात येणाऱ्या
शक्यतांच्या
एका
दीर्घ
कांरव्यासाठी…